Aryan Education society's high school, Girgaon

दक्षिण मुंबईतल्या मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडत असताना एक शाळा मात्र गेली ११८ वर्षं आपलं अस्तित्व टिकून आहे. ती म्हणजे गिरगावातली आर्यन हायस्कूल. ३ जून १८९७ रोजी गिरगावात 'मराठा एज्युकेशन सोसायटी'च्या बॅनरखाली शाळा सुरू झाली. पण पुढच्या दोन वर्षांत संस्थेची घटना व रितसर नियम तयार झाले. तेव्हा रघुनंदन कोठारे यांच्या सूचनेवरून या संस्थेचं नाव 'आर्यन एज्युकेशन सोसायटी' असं ठेवण्यात आलं. सुरुवातीला ही शाळा गिरगावातल्या काही खोल्यांत भरायची. मग ती गिरगावातल्या आंग्रेवाडीत भरू लागली. १९३७ मध्ये आर्यन एज्युकेशन सोसायटीने ऑपेरा हाऊस जवळच्या दोन देवळांच्या बाजूचं किलोर्स्कर भुवन विकत घेतलं. तिथे शाळेची चार मजली इमारत बांधली. पुढे एका उदार गृहस्थांच्या देणगीमुळे शाळेच्या इमारतीत पाचवा मजला आणि लिफ्टही आली. १९३० मध्ये या सोसायटीने पालघर इथे हायस्कूल सुरू केलं. सध्या गिरगावातल्या आर्यन हायस्कूलमध्ये मराठी व सेमी इंग्रजी अशी दोन माध्यमं आहेत. शाळेचे त्यावेळचे मुख्याध्यापक काळेसर यांनी शाळा चालवण्यासाठी ब्रिटिश सरकारकडून कोणतंही अनुदान घेतलं नाही. ' कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन' हे या संस्थेचं ब्रीदवाक्य आहे. आर्यन एज्युकेशन सोसायटीने ७ जून १९३३ रोजी गिरगावातच 'शारदा सदन' ही मुलींची शाळा सुरू केली. सध्या आर्यन शाळेत एकंदर १६०० विद्याथीर् शिक्षण घेतात. तर गिरगाव आणि पालघर मिळून एकूण १८० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आहेत. गिरगावातल्या आर्यन शाळेत अद्ययावत वाचनालय आहे. मुलांना कम्प्युटर ट्रेनिंगही दिलं जातं. शाळेत व्यायामशाळाही आहे. चित्रकलेचं दालन, वाचनालय, उपहारगृहही शाळेत आहेत. याच इमारतीत 'वनिता विनयालय' हे मुलींसाठीचं डी.एड. कॉलेजही आहे. डी.एड.च्या अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून मुलींना इथे शिवणकामही शिकवलं जातं. काळानुरूप आपण बदललं पाहिजे, हा विचार लक्षात घेऊन इथे सध्या ऑडिओ-व्हिज्युअल एज्युकेशनची सोयही उपलब्ध आहे. प्रयोगशाळेचंही आधुनिकीकरण करण्याचं काम सध्या सुरू आहे. आर्यनच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये डॉ. चिंतामणराव देशमुख, नटश्रेष्ठ दाजी भाटवडेकर, अशोक रानडे, गायक व संगीतकार सुधीर फडके यांचा उल्लेख करावा लागेल. मुख्य म्हणजे आर्यन एज्युकेशन सोसायटी ही शिक्षक, शिक्षक-सेवक यांच्यातफेर्च चालवली जाते. शाळेच्या प्रगतीत ज्या काळेसरांचं महत्त्वाचं योगदान आहे त्यांच्या नावाने इथल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी 'काळे मेमोरियल पतसंस्था' चालवली जाते. न्यायमूतीर् महादेव गोविंद रानडे हे आर्यन एज्युकेशन सोसायटीचे पहिले अध्यक्ष होते. पावसचे स्वामी स्वरूपानंद हेदेखील याच शाळेचे माजी विद्याथीर्. आर्यन एज्युकेशन सोसायटीतर्फे चालवल्या जाणाऱ्या गिरगावातल्या आर्यन हायस्कूलमध्ये श्रीकृष्ण जन्मोत्सव, शारदा सदनमध्ये शारदोत्सव तर पालघर इथल्या शाळेत गणेशोत्सव साजरा होतो. सध्या गिरगावातल्या आर्यन हायस्कूलमध्ये रशियन भाषेचं प्रशिक्षणही दिलं जातं. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी संस्थेतर्फे पालघर इथे भारत छात्रालय चालवलं जातं. येत्या १९ फेब्रुवारीला आर्यन हायस्कूलचा ११८ वर्धापनदिन आहे. येत्या काही वर्षांत अनेक नवनवीन उपक्रम राबवण्याचा संस्थेचा विचार आहे. सध्या गिरगावातील ऑपेरा हाऊस या गजबजलेल्या परिसरात या शाळेची इमारत उभी आहे. शाळेत अतिशय सामान्य कुटुंबातील मुलं शिक्षण घेण्यासाठी येतात. इतर मराठी शाळांप्रमाणेच या शाळेतही कमी- जास्त प्रमाणात आर्थिक समस्या आहेत. पण सगळ्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा आपला शिरस्ता शाळेने अविरत सुरू ठेवला आहे. सुसंकृत आणि आनंदी वातावरण, योग्य शिक्षणपद्धतीचा अबलंब आणि सुजाण संस्थाचालक, शिक्षक, पालक व विद्यार्थी यांच्या सहकार्याने एक आदर्श शाळा म्हणून ‘आर्यनने’ गिरगाव परिसरात नाव कमावले आहे. ‪#‎म_टा‬